
लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात होऊ देणार नाहीत : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोकणातील पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या भावना लक्षात घेता, लक्ष्मी ऑरगॅनिकसारखे प्रदूषणकारी उद्योग प्रकल्प चिपळूणसह संपूर्ण कोकणात सुरू होऊ दिले जाणार नाहीत, असे ठाम विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. चिपळूण येथे आयोजित महायुतीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोकण हा निसर्गसंपन्न व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश आहे. येथे उद्योग विकास आवश्यक असला तरी तो पर्यावरणपूरक आणि स्थानिकांच्या हिताचा असलाच पाहिजे. प्रदूषण वाढवणाऱ्या प्रकल्पांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर तसेच शेती व मत्स्यव्यवसायावर परिणाम होत असेल, तर असे प्रकल्प सरकार कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.
लक्ष्मी ऑरगॅनिक प्रकल्पामुळे संभाव्य प्रदूषणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही काळापासून चिपळूण, खेड व लोटे परिसरात तीव्र विरोध सुरू आहे. स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलने उभारली होती. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या विधानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असली, तरी या प्रकल्पावर पुढे नेमकी कोणती कारवाई होणार, परवानग्या रद्द केल्या जाणार का किंवा शासनस्तरावर कोणते ठोस आदेश निघणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, केवळ आश्वासन न देता ठोस निर्णय घेण्यात यावा. कोकणातील पर्यावरण टिकवण्यासाठी प्रदूषणकारी प्रकल्पांवर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
या घोषणेमुळे महायुती सरकार कोकणातील पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याचा संदेश गेला आहे. मात्र या विधानानंतर प्रत्यक्ष निर्णय व तात्काळ कारवाई झाली, तरच नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या वेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, गृहराज्यमंत्री ना. योगेशदादा कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, भाजप नेते प्रशांत यादव, नगराध्यक्ष उमेश सकपाळ तसेच महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.




