
रो- रो च्या अव्वाच्या सव्वा तिकीट दरामुळे कोकणवासियांच्या खिशाला बसणार मोठा फटका
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुंबई विजयदुर्ग रो-रो नौका सेवेला अखेर मुहूर्त सापडला असून ही सेवा १ मार्चपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. कोकणवासियांचे अनेक वर्षांपासूनचे जलमार्गाने प्रवासाचे स्वप्न यानिमित्ताने पूर्ण होणार असले तरी या सेवेसाठी जाहीर करण्यात आलेले तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नसल्याचे मनसेचे सरचिटणीस मनोज भाऊ चव्हाण यांनी सांगितले.
सागरी मंडळाने या ६ तासांच्या अतिजलद प्रवासासाठी श्रेणीनुसार दर निश्चित केले आहेत. यामध्ये इकॉनॉमी क्लाससाठी ३,००० रुपये, प्रीमियम इकॉनॉमी ५,००० रुपये, बिझनेस क्लास ७,००० रुपये आणि प्रथम श्रेणीसाठी ९,००० रुपये इतके तिकीट आकारले जाणार आहेत. प्रवाशांव्यतिरिक्त वाहनांसाठीचे दरही ६,००० ते ९,००० रुपयांच्या दरम्यान आहेततर दुचाकीसाठी १,००० रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या कुटुबाने कारसह प्रवास केल्यास हा खर्च किमान १२,००० ते १८,००० रुपयांच्या घरात जात असल्याने, हा प्रवास मुंबई-गोवा महामार्गाच्या महागडा ठरणार आहे.




