रो-रो’च्या माध्यमातून महत्त्वाचे जिल्हे आणि राज्ये मुंबईशी जोडणार : नितेश राणे


मुंबई-“शिमग्याच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा रो-रो सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात रो-रोच्या माध्यमातून मुंबईला अन्य जिल्हे आणि राज्यांसोबत जोडून पर्यटन, रोजगार आणि कृषी क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न राहील”, अशी माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.
विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “महाराष्ट्रात जलवाहतूक सुरु करावी, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. २०१४ ते २०१९ मध्ये त्यांच्याकडे बंदरे खाते असताना त्यांनी काही प्रकल्पांना चालना देत, नव्या संकल्पना मांडल्या होत्या. मुंबई आणि कोकणाला जलवाहतुकीच्या माध्यमातून जोडणे ही त्यांचीच संकल्पना आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली या संकल्पना सत्यात उतरवण्याची सुरुवात आम्ही केली आहे.”
“येत्या १ मार्च पासून मुंबई आणि कोकणाला जलमार्गाने जोडण्याचा पहिला टप्पा सुरू करीत आहोत. मुंबई ते विजयदुर्ग असा हा पहिला मार्ग असेल. येत्या काळात मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते महाड असे असंख्य मार्ग वाढवणार आहोत. मुंबई ते विजयदुर्ग या बोटीबाबतची संपूर्ण माहिती वेबसाईटवर उपलब्ध असून, तिकीटची बुकिंगसुद्धा सुरू झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परवानगी मिळाल्यावर चाचणी केल्यानंतरच रो-रो सेवा सुरू करीत आहोत. प्रवाशांच्या आरोग्याची काळजी घेत १ मार्चपासून बोटीवर डॉक्टरांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे”, अशी माहिती मंत्री राणे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button