
राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन महिला व मुली बेपत्ता
- राज्यात गेल्या वर्षभरात तब्बल ४८ हजार २७८ अल्पवयीन महिला व मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली असून १३ हजार अल्पवयीन मुली आणि महिलांचा अद्याप शोध लागलेला नसल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी विधानसभेत दिली.
राज्यात विशेषत: मुंबई, नवी मुंबई, रायगड, नागपूर, छतपती संभाजीनगर आदी शहरांमध्ये मोठ्याप्रमाणात अल्पवयीन मुली बेपत्ता होत असल्याबाबत मंगेश कुडाळकर, प्रशांत ठाकूर आदी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात गृह विभागाने ही माहिती दिली. राज्यात सन२०२५मध्ये हरवलेल्या ४८ हजार २७८ महिलांपैकी ३६ हजार ५८१ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. तर अजूनही ११ हजार ६९७ महिलांचा शोध लागलेला नाही.
अशाच प्रकारे हरवलेल्या १२ हजार ११३ अल्पवयीन मुलींपैकी १० हजार २९५ महिलांचा शोध लागला असून १८१८ मुली अद्याप बेपत्ता आहेत. विशेष म्हणजे सन २०२४मधील हरवलेल्या ४५ हजार ६६२ महिला आणि अल्पवयीन मुलींच्या विचार करता गेल्या वर्षभरात हरवलेल्या महिला- अल्पवयीन मुलींची संख्या अधिक आहे. मुंबईतून हरवलेल्या ४ हजार ५१५ अल्पवयीन मुले-मुलींपैकी ४ हजार ४५५ मुलांचा मुले-मुलींचा शोध लागला आहे. बेपत्ता व शोषित शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी राज्यात २० जानेवारीपासून ऑपरेशन मुस्कान सुरु करण्यात आले हरविलेल्या मुलांचा शोध घेण्यात येत आहे.




