
राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार*;__________________
खासगी अनुदानित माध्यमिक शाळांसह प्राथमिक शाळांची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील संचमान्यता अंतिम टप्प्यात आहे. मात्र, माध्यमिक विभागाकडील अडीच हजार आणि खासगी प्राथमिकच्या सुमारे पाचशे शाळांनी अनुदानाचा प्रकार, शाळांचे माध्यम, मंजूर व कार्यरत पदे, पटसंख्या याची माहिती अद्याप दिलेली नाही.या शाळांना माहिती देण्यासाठी शिक्षण संचालकांनी मुदत दिली आहे. मुदतीत माहिती न देणाऱ्या शाळांमधील सर्वांचेच पगार मार्चपासून थांबविले जाणार आहेत.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील पटसंख्येनुसार प्राथमिक व माध्यमिक शाळांची सध्या संचमान्यता केली जात आहे. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार संचमान्यतेनंतर पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल. त्यानंतर खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील रिक्त पदांची भरती होईल. त्याचवेळी राज्यातील जिल्हा परिषदांच्या ६५ हजार शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. १५ जूनपूर्वी या सर्व प्रक्रिया पूर्ण होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर प्राथमिक व माध्यमिक-उच्च माध्यमिक विभागाच्या संचालकांनी सर्व खासगी अनुदानित शाळांमधील पटसंख्या आणि रिक्त- अतिरिक्त शिक्षकांची माहिती मागविली आहे. पण, अद्याप तीन हजार शाळांनी माहिती दिलेली नाही. या आठवड्यात माहिती न दिल्यास त्या शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबविला जाणार असून तसा इशारा शिक्षण संचालकांनी दिला आहे.




