
रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या शीळ धरण ते जॅकवेल पाईपलाईन पूर्ण
रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्वाच्या असलेल्या शीळ धरण ते जॅकवेल दरम्यान टाकण्यात येणार्या सुमारे ११०० मीटर लांबीच्या पाईपलाईनचे काम अखेर तीन वर्षानंतर पूर्ण झाले आहे. नैसर्गिक उताराने पाणी जॅकवेलमध्ये येवू लागल्याने दरमहा सुमारे दोन लाख रुपयांचा वीजखर्च वाचणार आहे.
पूर्वी शीळ धरण येथील पाणी सहा फ्लोटींग पंपाच्या सहाय्याने जॅकवेलमध्ये चढवावे लागत होते. यापैकी चार पंप २४ तास सुरू ठेवावे लागत, तर दोन पंत पर्यायी स्वरूपात ठेवले जात. या विद्युत पंपावर दरमहा सुमारे दोन लाख रुपयांचा वीजबिलाचा भुर्दंड पालिकेला सहन करावा लागत होता. गेल्या तीन वर्षात अंदाजे पाऊण कोटी रुपयांहून अधिक रक्कम वीजबिलापोटी खर्च झाली आहे. उपाय म्हणून फ्लोटिंग पंप बसवण्यात आले होते. सुधारित पाणी योजनेत धरण ते जॅकवेल दरम्यान सुमारे ११०० मीटर पाईपलाईनचा समावेश होता. मात्र हे काम तीन वर्षे रखडले. दर पावसाळ्यापूर्वी हा प्रश्न ऐरणीवर येत होता. पूरस्थितीत फ्लोटिंग पंप वाहून जाण्याची भीती व्यक्त होती. तसे झाल्यास ऐन पावसाळ्यात शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता होती.
प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित केल्यानंतर अखेर पालिकेने ठेकेदार नेमून पाईपलाईनचे काम पूर्ण करून घेतले. आता धरणातील पाणी नैसर्गिक उताराने थेट जॅकवेलमध्ये येत असल्याने वीजखर्चात मोठी बचत होणार आहे.www.konkantoday.com




