
रत्नागिरी नगर परिषदेत लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यात वाद चिघळला, उपनगराध्यक्षांना शिवीगाळ व धमकीप्रकरणी नगर अभियंत्याच्या निलंबन-बडतर्फीचा ठराव
रत्नागिरी नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांना शिवीगाळ व मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून नगर अभियंता यतिराज जाधव यांच्यावर कठोर कारवाईचा ठराव विशेष सभेत मंजूर करण्यात आला आहे. अभियंता जाधव यांना प्रथम निलंबित करावे आणि त्यानंतर सखोल चौकशी करून सेवेतून बडतर्फ करावे, असा ठराव सभेत सर्वानुमते संमत करण्यात आला.
नगरपरिषदेमार्फत करण्यात आलेल्या शौचालय दुरुस्ती व नूतनीकरणाच्या कामांबाबत गेल्या चार वर्षांतील निविदांची कागदपत्रे उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी कंत्राटी अभियंत्यांकडे मागितली होती. मात्र चार दिवस उलटूनही कागदपत्रे न मिळाल्याने २२ जानेवारी रोजी त्यांनी नगरपरिषदेत जाब विचारला. यावेळी नगर अभियंता यतिराज जाधव यांनी दालनाबाहेर येत उपनगराध्यक्षांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असून, या प्रकारामुळे नगरपरिषदेत मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजप गटनेते राजू तोडणकर आणि शिवसेनेचे गटनेते बाळू साळवी यांनी विशेष सभेची मागणी केली होती. त्यानुसार सोमवारी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली. सभेत भाजप गटनेते राजेश तोडणकर यांनी विषयाचे वाचन करताना सांगितले की, हा प्रकार लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर थेट आघात करणारा आहे. त्यांनी अभियंता जाधव यांच्या निलंबन व बडतर्फीचा प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावाला शिवसेना (शिंदे गट), भाजप तसेच शिवसेना (ठाकरे गट) अशा सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी एकमताने पाठिंबा दिला. नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी ठरावाला मंजुरी दिल्यानंतर आता पुढील निर्णयासाठी प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने जितेंद्र विचारे यांनी माहिती देताना सांगितले की, अभियंता जाधव यांना ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. दुसरीकडे, अभियंता जाधव यांनी आपल्या खुलाशात सर्व आरोप फेटाळून लावत हे आरोप एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. या आरोपांमुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झाल्याचा दावा करत, संबंधित दिवशीचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्याची मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.



