
रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार गौरव; ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानात १०० टक्के गुणांसह राज्यात बाजी.
रत्नागिरी:
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ अभियानांतर्गत प्रशासकीय कामकाजात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी गारवे यांनी प्रशासकीय कामात आणलेली गतिमानता आणि पारदर्शकतेमुळे रत्नागिरी नगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे.
राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजातील प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी आणि सुशासनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ६ मे २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात राज्याच्या अनेक भागांत उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे या कार्यक्रमाला १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या विस्तारित कालावधीत मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने नगरपालिकेचे कामकाज पूर्णत्वास नेले.
या मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या मूल्यमापनात रत्नागिरी नगरपालिकेला ८० पैकी ८० असे १०० टक्के गुण प्राप्त झाले आहेत. मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी पदभार स्वीकारल्यापासून नगरपालिकेतील आस्थापना विषयक सर्व बाबी अद्ययावत करण्यावर भर दिला. यामध्ये प्रामुख्याने सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, सरळ सेवा नियुक्ती आणि बिंदू नामावलीचे प्रमाणीकरण करून घेणे यांसारख्या तांत्रिक कामांचा समावेश होता. विशेष म्हणजे, प्रशासकीय संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांनी १०० टक्के अनुकंपा नियुक्त्यांचे उद्दिष्टही यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
प्रशासकीय कामात तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी गारवे यांनी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले. केंद्राच्या ‘आयजीओटी’ (iGOT) ऑनलाइन प्रशिक्षण प्लॅटफॉर्मवर सर्व कर्मचाऱ्यांची नोंदणी करून घेऊन विहित कोर्सेस पूर्ण करून घेतले. तसेच, कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे आणि कार्यालयीन कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्व निकषांवर रत्नागिरी नगरपालिकेने अव्वल स्थान पटकावल्याने, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा हा सत्कार मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या कष्टाचे आणि प्रभावी प्रशासनाचे फळ मानले जात आहे. या यशामुळे नगरपालिकेच्या सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




