
रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान
ग्रामीण भागातील कारभार हाकणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील नऊ पंचायत समित्यांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या. जि.प.साठी 151, तर पंचायत समितीसाठी 321 अशा 472 उमेदवारांचे राजकीय भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांत बंद झाले. सोमवारी (दि. 9) मतमोजणी होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या 56, तर पंचायत समित्यांच्या 112 जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत झाली. जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढतीही झाल्या. ’मिनी मंत्रालय’ असे संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेवर वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली. शनिवारी सायंकाळी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन प्रत्येक तालुक्यातील स्ट्राँग रुममध्ये ठेवण्यात आली असून सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडाला होता. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत आहे. काही ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना मैत्रिपूर्ण लढतीमुळे तिरंगी व चौरंगी लढतीही झाल्या आहेत




