
रत्नागिरी जिल्हा बँकेला “बेस्ट बँक ऑफ द इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर पुरस्कार”
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला मे. इ प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांचेकडून को-ऑप. बँक्स टॉप १०० समिट २०२५चा “बेस्ट बँक ऑफ द इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तळागाळातील जनतेसाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नत्तीसाठी कृतीशिल जाणीवेतून सहकार क्षेत्रामध्ये वाटचाल करित आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून एक सहकार पर्व सुरू झाले असून, जिल्ह्यातील शहर व ग्रामीण पातळीवरील बँकेचे ग्राहक, हितचिंतक, ठेवीदार व कर्जदार यांचे आर्थिक उन्नत्तीसाठी बँक विविध योजना राबवीत आहे. कृषि क्षेत्राला प्राधान्य देणेकरिता सहकार क्षेत्रातील मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थांमार्फत प्राथमिक शेती संस्थांचे पदाधिकारी व सचिव यांना कर्जवाटप व वसुलीसंदर्भात प्रबोधन करण्याकरिता बँकींग विषयक कार्यशाळा व शेतकरी मेळाव्यांचे बँक दरवर्षी आयोजन करीत असते. बँकेने सहकारी संस्थांच्या सबलीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले आदि.३१.०३.२०२५ अखेर बँकेच्या ठेवी ₹२८६६.८७ कोटी, कर्जे ₹२१९९.६४ कोटी असून बँकेने ₹५००० कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला आहे. तसेच बँकेला सलग १५ वर्षे ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला असून, सलग १३ वर्षे नक्त एन.पी.ए.चे प्रमाण ०% आहे.
बँकेच्या ठेवींमधील वृध्दी, कर्जवसुली तसेच नफ्यामध्ये उल्लेखनीय वाढ झाली असून, यासाठी बँकेचे सभासद, हितचिंतक याचबरोबर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे व मा. संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बँकेला आजपर्यंत महाराष्ट्र शासनाचे सहकार भूषण व सहकारनिष्ठ असे दोन पुरस्कार प्राप्त झाले असून बँकेला आतापर्यंत एकूण १९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
बँकेची जिल्ह्यात १९ ए.टी.एम. सेंटर कार्यान्वित असून, सध्या विविध क्षेत्रांत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब होत असून, डिजिटल बँकींग क्षेत्र देखील अधिकाधिक विस्तारित होत आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने देखील बँकेच्या ग्राहकांना विविध डिजिटल सेवा पुरविल्या आहेत. रत्नागिरी जिल्हा बँकेचे सहकार क्षेत्रातील नेतृत्वगुण, नावीन्य, बैंकिंग अद्यावत धोरणे, नवीन तंत्रज्ञान तसेच बँकिंग क्षेत्रातील सकारात्मक बदल, बँकेच्या या कामगिरीमुळे बँकिंग क्षेत्रातील बँकेच्या योगदानाचा विचार करुन मे. इ प्लस इंटेलेक्च्युअल मिडीया, नवी मुंबई यांनी रत्नागिरी जिल्हा बँकेला सन २० २५ चा बेस्ट बँक ऑफ द इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर हा पुरस्कार देवून गौरविले आहे.सदर पुरस्कार वितरण सोहळा दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी नोवोटेल हॉटेल, खोपोली येथे डॉ. संजय शिंदे, निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करणेत आला. सदर सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून श्री. गोपाळ भगत, डेप्युटी सीईओ, इंडियन बँकींग असोसिएशन, श्री. प्रमोद कर्नाड, माजी कार्यकारी संचालक, महाराष्ट्र राज्य बँक, श्री. अजय ब्रम्हेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र को. ऑप. बँक फेडरेशन, या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रमात मा. सतीष मराठे, संचालक, सेंट्रल बोर्ड ऑफ बैंक रिझर्व्ह बँक, श्री. सुन्मेश जोशी, डेप्युटी डायरेक्टर जनरल मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन, भारत सरकार या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती. सदर पुरस्कार सोहळ्याला बँकेचे संचालक श्री. मधुकर शंकर टिळेकर, श्री. रामचंद्र गणपत गराटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर प्रभाकर गिम्हवणेकर, सरव्यवस्थापक श्री. समीर रमेश दळवी, उपसरव्यवस्थापक श्री. संतोष कृष्णा खेडसकर हे उपस्थित होते.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमीत्ताने सद्यस्थितीत बँकिंग क्षेत्रात होणारे अमुलाग्र बदल व बदलत्या अत्याधुनिक तंत्राच्या वापरामुळे बँकांपुढे नवीन आव्हाने याबाबत चर्चासत्र आयोजित केले होते. यातून बँकांनी पुढे कशी वाटचाल करावी यावर पुरस्कार सोहळ्या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
बँकेला “बेस्ट बँक ऑफ द इअर व इनोव्हेटिव्ह बँक ऑफ इअर पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे, बँकेच्या भविष्यकालीन वाटचालीस मान्यवरांकडून मनःपुर्वक शुभेच्छा देण्यात आल्या असून, बँकेला मिळालेल्या पुरस्काराबाबत विविध स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे




