रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दोन अत्याधुनिक ‘सर्व्हिलन्स बस’ दाखल


रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाची क्षमता वाढवण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस ताफ्यात दोन अत्याधुनिक ‘सर्व्हिलन्स एसएमएल’ (Surveillance SML) बसचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) यांच्या माध्यमातून या विशेष बस जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाल्या असून, पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या शुभहस्ते नुकतेच या वाहनांचे उद्घाटन करण्यात आले.

या अत्याधुनिक बसची रचना विशेषरित्या करण्यात आली असून, त्यामध्ये पोलीस दलाच्या कार्यपद्धतीनुसार महत्त्वाचे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. या बसच्या चारही बाजूंना हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, ज्यामुळे मोर्चे, आंदोलने, बंदोबस्त आणि कोणत्याही संवेदनशील प्रसंगी परिसरावर ३६० अंश कोनातून बारीक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि संशयास्पद हालचालींवर तातडीने कार्यवाही करणे पोलिसांना अधिक सुलभ होईल.

वाहनाच्या अंतर्गत संरचनेतही विशेष सुधारणा करण्यात आली असून, बसच्या आतूनच छतावर जाण्यासाठी शिडीची सुविधा उपलब्ध आहे. छतावर फोल्डेबल रेलिंग बसवण्यात आले असून, काही क्षणांतच तिथे एक सुरक्षित निरीक्षण मंच (प्लॅटफॉर्म) तयार करता येतो. या मंचावर छत्री लावण्यासाठीही स्वतंत्र जागा देण्यात आली आहे, जेणेकरून कोणत्याही हवामानात पोलीस अधिकारी आणि अंमलदार उंचावरून परिस्थितीचे प्रभावी निरीक्षण करू शकतील.

या बसच्या समावेशामुळे रत्नागिरी पोलीस आता अधिक तंत्रज्ञानसक्षम झाले असून, भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. उद्घाटन प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी, पोलीस उपाधीक्षक श्रीमती राधिका फडके यांच्यासह विविध पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button