
रत्नागिरीच्या विकासात्मक भविष्यासाठी १९ रोजी ‘मंथन’ कार्यक्रम
शहरी विकासावर व्यापक परिसंवाद
रत्नागिरी : शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी ‘मंथन’ या उपक्रमाचे आयोजन आयआयए रत्नागिरी-सिंधुदुर्ग उपकेंद्राच्या माध्यमातून करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० या वेळेत ही कार्यशाळा मारुती मंदिर येथील हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे होणार आहे. या कार्यशाळेत मार्गदर्शन सिडकोचे माजी मुख्य वास्तुविशारद आर्किटेक्ट दिनकर सामंत मार्गदर्शन करणार आहेत.
महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नगररचना, सार्वजनिक पायाभूत सुविधा विकास आणि प्रकल्प अंमलबजावणीचा श्री. सामंत यांना मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीकोनातून परिसंवाद होणार आहे.
शहरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि संधी या दोन्हींचा सखोल विचार या कार्यक्रमात होणार आहे. शहरी नियोजन व पायाभूत सुविधा, पर्यावरणीय पुनरुज्जीवन व पर्यावरणीय समतोल, सार्वजनिक मोकळी मैदाने व वाहतूक व्यवस्था, संसाधन व्यवस्थापन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
वृक्षतोड, अधिवास नष्ट होणे, हवा व पाण्याचे प्रदूषण, ऊर्जा वापरात वाढ आणि ‘अर्बन हीट आयलॅंड’सारख्या पर्यावरणीय परिणामांवरही विचारमंथन होईल. तांत्रिक तज्ज्ञ, अभ्यासक, विद्यार्थी, धोरणनिर्माते आणि जागरूक नागरिक यांना एकत्र आणून शहराच्या विकासात्मक भविष्यासाठी व्यावहारिक आणि शाश्वत उपाय शोधण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या कार्यक्रमासाठी रत्नागिरीतील सजग, जाणकार आणि विकासाच्या दृष्टीने योगदान देऊ इच्छिणाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘मंथन’ हा केवळ परिसंवाद नसून रत्नागिरीला सक्षम, समावेशक आणि भविष्यवेधी शहर बनविण्यासाठी सामूहिक चिंतन व कृतीची प्रक्रिया असल्याचे आयआयएचे सल्लागार आर्किटेक्ट संतोष तावडे यांनी स्पष्ट केले आहे.




