
मोबाईलचा वापर किती करावा, हे खेळाडूंनी ठरवावे
डॉ. चंद्रजीत जाधव : डेरवण युथ गेम्सचे दिमाखात उद्घाटन


चिपळूण : आजच्या आधुनिक युगात मोबाईलविरहित समाजव्यवस्था होऊ शकत नाही, हे वास्तव आहे; मात्र मोबाईलचा वापर किती आणि कसा करावा, याचे भान प्रत्येक खेळाडूने ठेवणे आवश्यक आहे. तसेच शिस्त आणि सरावाच्या जोरावरच खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात, असे प्रतिपादन महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी केले.

डेरवण येथे आयोजित ‘डेरवण युथ गेम्स’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले. यंदा विजेत्यांना पदके, चषक आणि रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. १२०० पदके, ११५ करंडक स्पर्धेत खेळाडूंना बक्षिसरूपाने देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या वेळी उपस्थित युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना श्री. जाधव यांनी तंत्रज्ञान आणि आरोग्य या विषयांवर मोलाचे विचार मांडले व खेळात नैपुण्य मिळवण्याचा ध्यास घेण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, केवळ सहभाग घेणे पुरेसे नसून खेळाडूंनी खेळामध्ये नैपुण्य मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घेतले पाहिजेत. शिस्त आणि सरावाच्या जोरावरच खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे खेळाडूंनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. जंकफूड खाल्ल्यामुळे शरीरातील अनावश्यक कॅलरीज वाढतात, ज्याचा विपरित परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि शरीरयष्टीवर दिसून येतो. यामुळे मैदानावर खेळताना तुमची क्षमता कमी पडू शकते. जर तुम्हाला उत्कृष्ट कामगिरी करायची असेल तर सकस आहाराला प्राधान्य द्या, असा सल्ला त्यांनी खेळाडूंना दिला.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उद्योजक कमलेश जोशी, रुग्णालय संचालिका डॉ. सुवर्णा पाटील, शरयू यशवंतराव, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, अजित गाळवणकर, संदीप तावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर, प्रशिक्षक आणि मोठ्या संख्येने युवा खेळाडू उपस्थित होते. जाधव यांच्या या आश्वासक मार्गदर्शनामुळे खेळाडूंमध्ये नवा उत्साह पाहायला मिळाला.
चौकट
अटीतटीच्या लढती
एसव्हीजेसीटीच्या क्रीडासंकुलात ६ मार्चपर्यंत अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबलटेनिस, जलतरण, तिरंदाजी, नेमबाजी, बुद्धिबळ, कॅरम, लंगडी, खो-खो, कबड्डी, मल्लखांब, बास्केटबॉल, फुटबॉल, व्हॉलीबॉल अशा विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद या राज्याच्या विविध भागांतून खेळाडू, संघ डेरवण येथे दाखल होत आहेत. सुमारे सात हजार खेळाडूंनी या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. संघांमधील अटीतटीच्या लढती पाहण्यासाठी क्रीडाप्रेमीही येथे येऊ लागले आहेत.




