
मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत १०,००० कोटींचा महाघोटाळा, महाराष्ट्रात खळबळ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत १०,००० कोटींचा ‘महा-घोटाळा’ झाला आहे. NOPL Green, NACOF, IIPL आणि ONIX सारख्या कंपन्यांनी चक्क ‘बनावट बँक गॅरंटी’ देऊन कंत्राटं लाटली?
असा गंभीर आरोप विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्ष नेते तथा ठाकरेसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, महावितरणचे अधिकारी आणि कंपन्यांचे संचालक (दिव्येश सावलिया, पी. सुरेश बाबू इ.) यांच्या संगनमताने शेतकऱ्यांच्या नशिबी अंधार टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? EOW कडे ५ गुन्हे दाखल होणे ही नामुष्की आहे.
अधिकाऱ्यांचे थेट नाव घेत दानवे यांनी ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वसुली होणार का? संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कोण करणार? अपारंपरिक ऊर्जा खात्याचा कारभार पाहणाऱ्या ‘पारदर्शक कारभाराचे पुरस्कर्ते’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चौकशी करणार का? असे सवाल उपस्थित करत दानवे यांनी राज्यात खळबळ उडवली आहे.




