मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक दिवसभर राहणार विस्कळीत, गॅस गळती थांबवण्यासाठी तज्ज्ञ पाचारण!


राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून बंद आहे. या महामार्गावरील बोरघाटात गॅस टँकर उलटला असून ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती झाली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पूर्ण महामार्गच बंद करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. गळती रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी आता या क्षेत्रातील तज्ज्ञांना बोलावले असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

गळती केव्हा रोखली जाईल हे आताच सांगता येणार नसल्याने पुढील आणखी काही तास महामार्गावरील वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक-प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, शक्यतो मुंबई-पुणे प्रवास आज टाळावा, असे आवाहन एमएसआरडीसीकडून करण्यात आले आहे.

महामार्गावरील बोटघाट टॅब हद्दीत मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास गॅस टँकर उलटला. त्यातून ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची मोठी गळती झाली. गॅस गळतीमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने एमएसआरडीसीने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहिनी पूर्णत: वाहतुकीसाठी बंद केली. काही वेळाने मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून संथगतीने वाहतूक सुरू होती. महामार्गावर २५ किमीच्या रांगा लागल्या होत्या. मात्र त्यानंतर उशिरा वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह इतर पर्यायी मार्गाने वळवून महामार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता राकेश सोनावणे यांनी दिली.

तर घटनास्थळी त्वरित एमएसआरडीसीचे अधिकारी-कर्मचारी, वाहतूक पोलीस, महामार्ग पोलीस दाखल झाले असून गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांना यात यश आले नाही. त्यामुळे आता या क्षेत्रातील तज्ज्ञांना गॅस गळती रोखण्यासाठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्याकडून गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

गॅस गळती रोखण्यासाठी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही. अत्यंत आव्हानात्मक काम असल्याने यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तर पुढे आणखी काही तास वाहतूक बंदच राहणार आहे. गळती रोखल्यानंतरही वाहतूक पूर्णपणे सुरू केली जाणार नसून एक-एक मार्गिका सुरू ठेवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास टाळावा, गरज असेल तरच पर्यायी मार्गाने मुंबई-पुणे प्रवास करावा, असे आवाहन सोनावाणे यांनी केले. राज्यातील अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग १७ तासांहून् अधिक काळ ठप्प असल्याने त्याचा मोठा फटका बसत आहे. वाहनचालक-प्रवासी, रुग्ण अशी सर्वांचीच गैरसोय होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button