
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरओणी तिवंदामाळ परिसरात आज सकाळी भीषण अपघात.चालकाचा जागीच मृत्यू
राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी भीषण अपघात घडला. ओणी तिवंदामाळ परिसरात सकाळी सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून, या दुर्घटनेत एका ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनीचा एक ट्रक गोवा ते मुंबई या दिशेने जाण्यासाठी ओणी तिवंदामाळ येथील एका धाब्याच्या समोर रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच वेळी गोव्यातून मुंबईकडे जाणारा भारत बेंझ कंपनीचा भरधाव ट्रक अचानक त्या उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडकला. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की भारत बेंझ ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.या अपघातात भारत बेंझ कंपनीच्या ट्रकमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.




