
मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका येथे केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील हातिवले टोलनाका येथे केलेल्या कारवाईत गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि अशोक लेलॅंड कंपनीचा टेम्पो असा एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे..गोवा बनावटीच्या दारूची मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक केली जात असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक सी.एल.कदम, जवान रोहीत लोंढे, सागर उबाळे व कर्मचारी यांनी मुंबई गोवा महामार्गावर राजापूर तालुक्याच्या हद्दीत हातिवले टोलनाका येथे शनिवारी पहाटे सापळा रचला होता. याच दरम्यान गोव्याहून आलेल्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या अशोक लेलॅंड कंपनीचा बडा दोस्त या टेम्पोची तपासणी केली असता टेम्पोमधे गोवा बनावटीचा दारुसाठा आढळून आला. त्यानंतर मुद्देमालासह टेम्पो ताब्यात घेण्यात आला.
आज शनिवारी लांजा उत्पादन शुल्क विभाग या ठिकाणी सदर मुद्देमालाची मोजणी करण्यात आली. यामध्ये जप्त करण्यात आलेल्या गोवा बनावटी विदेशी मद्याचे यामध्ये टुबर्ग स्ट्रॉंग बिअर, किंगफिशर
स्ट्रॉंग बिअरचे टीन व अन्य मद्य साठा ज्याची किंमत १८ लाख १३ हजार १२० रूपये आणि वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला अशोक लेलॅंड कंपनीचा बडा दोस्त या टेम्पो ( क्र. एम .एच.०८ एपी ४३८७) किंमत ५ लाख ५० हजार रुपये असा एकूण २३ लाख ६३ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे




