
मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ भटक्या जनावरांना धडक, तीन गुरांचा मृत्यू
मुंबई-कोकण मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा कुडाळ रेल्वे स्टेशनजवळ अपघात झालाय.मुंबईकडे जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनने भटक्या जनावरांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन गुरांचा मृत्यू झाला. धडकेमुळे ट्रेनच्या इंजिनात बिघाडदेखील झाला. इंजिन बंद पडल्यामुळे प्रवाशांचा दीडतास खोळंबा झाला.
इंजिन बंद पडल्यानं वंदे भारत ट्रेन कुडाळ रेल्वे स्थानकात दीड तास अडकून पडली होती. दरम्यान ट्रेनला दुसरे इंजिन जोडल्यानंतर वंदे भारत मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली. जनावरांच्या धडकेत वंदे भारत ट्रेनंच मोठं नुकसान झालंय. ट्रेनच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. ट्रेनचा पुढील भाग पूर्ण तुटलाय. अपघातग्रस्त ट्रेनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.मात्र वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दोन्हीकडील वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे भाविकांना मोठा फटका बसलाय. गाड्या सुमारे चार ते पाच तास उशिराने धावत आहेत. कोकण रेल्वचे वेळापत्रक कोलमडलं आहे. त्यामुळे आंगणेवाडी जत्रेसाठी आलेल्या भाविकांचा यामुळे मोठा खोळंबा झालाय. तसेच प्रवाशांना ताटकळत स्थानकात उभं रहावं लागतंय.




