मिरजोळे येथील श्री कालिकादेवी मंदिराचा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न


रत्नागिरी ):
रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे येथील ग्रामदैवत श्री कालिकादेवी मंदिराचा भव्य कलशारोहण सोहळा आज, बुधवारी (१८ फेब्रुवारी) विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा शके १९४७ या शुभ मुहूर्तावर झालेल्या या सोहळ्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.


या सोहळ्याची सुरुवात सकाळी ८ वाजता मंगल चरण, संकल्प आणि वास्तूशांती या विधींनी करण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता श्री. अनंत वासुदेव गुरव यांच्या निवास्थानापासून मुख्य कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ‘आई कालिकादेवीच्या’ जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने मिरजोळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण केले होते. त्यानंतर मंदिरात होमहवन आणि पूर्णाहुतीचा कार्यक्रम पार पडला.


दुपारी १ वाजता सज्जनगडचे श्री. पाटील महाराज रामदासी यांच्या शुभहस्ते आणि मंत्रोच्चाराच्या जयघोषात मंदिराच्या शिखरावर सुवर्णकलश प्रस्थापित करण्यात आला. शिखर प्रतिष्ठान आणि मुख्य कलशारोहण संपन्न होताच भाविकांनी देवीचा जयजयकार केला. यानंतर महाआरती व मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना श्री. पाटील महाराजांनी धार्मिक परंपरेचे महत्त्व विशद केले.


कलशारोहण सोहळ्यानंतर दुपारी २ वाजेपासून उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे नेटके नियोजन मिरजोळे ग्रामस्थ, मानकरी आणि श्री कालिकादेवी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री. शरद गोपाळ पाटील यांनी केले होते. रात्री ८ वाजता देवीच्या पारंपरिक गोंधळाने या ऐतिहासिक सोहळ्याची सांगता होणार असून, या उत्सवामुळे संपूर्ण गावात मांगल्याचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button