
मानधन वाढीच्या मागणीसाठी ग्राम रोजगार सेवकांचा बेमुदत संप सुरु
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मानधन वाढीच्या मागणीसाठी तालुक्यातील सर्व ग्राम रोजगार सहाय्यकांनी १ फेब्रुवारी २०२६ पासून बेमुदत संप पुकारला आहे. ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात आलेल्या या संपाला तालुक्यातील मनरेगा कंत्राटी अधिकारी आणि कर्मचार्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. ५ ते १० वर्षांपासून हे कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर ग्रामपंचायतींमध्ये काम करत आहेत. मस्टर काढणे, जिओ टॅगिंग, मजुरांची ई-केवायसी करणे आणि कामांचे प्रस्ताव तालुका स्तरावर सादर करणे अशा विविध जबाबदार्या ते पार पाडत आहेत. मात्र, मिळणार्या अल्प मानधनामुळे साध्या प्रवासाचा खर्च करणेही कठीण झाले असून, अनेक सेवकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने ३ ऑ गस्ट २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, प्रत्येक ग्राम रोजगार सहाय्यकाला ८ हजार रुपये अधिक २ हजार रुपये असे निश्चित मानधन लागू करावे, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे.
www.konkantoday.com




