
महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने रत्नागिरी येथे मधुभाई : साहित्य, समाज कृतज्ञता सोहळा
ज्येष्ठ साहित्यिक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा सन्मान सोहळा व प्रकट मुलाखातीचे आयोजन
रत्नागिरी : महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कोकणातील सर्वसामान्यांचे जनजीवनासह विविध विषयांना आपल्या सिद्धहस्त लेखणीच्या माध्यमातून सर्वदूर नेणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि कोकणातील लिहित्या हातांना हक्काचे व्यासपीठ कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारे साहित्यसंकल्पक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा, त्यांनी दिलेल्या साहित्यिक योगदानाबद्दल भव्य नागरी सत्कार आणि पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या समृद्ध अनुभव विश्वावर आधारित प्रकट मुलाखत शनिवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी सांयकाळी ४:०० वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषा विभागाचे मंत्री नामदार डॉ. उदय सामंत यांच्या माध्यमातून मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृंद्धिगत होण्यासाठी सातत्याने विविधांगी उपक्रम राबविण्यास पुढाकार घेत असतात. त्यानुषंगाने नामदार डॉ. उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन मागील अनेक दशके साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणारे आणि ज्यांनी कोकणातील नवसाहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदची स्थापना करणारे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
हा सत्कार सोहळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची, त्यांच्या आजपर्यंतच्या अनुभवावर आधारित प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. ही मुलाखत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक अशोक बागवे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, अभिजित हेगशेट्ये घेणार असून, या मुलाखतीतून पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा प्रवास उलगडणार आहेत.
तसेच या कार्यक्रमात कोकणातील सात जिल्ह्यातील अनेक नामवंत लेखकांनी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या कार्यावर आधारित लिहिलेल्या गौरव अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सौ. नमिता कीर यांनी सांगितले की, मधु मंगेश कर्णिक हे केवळ साहित्यिक नसून त्यांनी साहित्याच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक बांधणीचा मोठा ध्यास घेतला आहे. नव्या लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या हेतूने त्यांनी उभी केलेली ‘कोमसाप’ आज महाराष्ट्राची अस्मिता बनली आहे. १९६० च्या दशकात त्यांनी मालगुंड येथे कवी केशवसुतांचे स्मारक उभारण्यासाठी जे कष्ट उपसले, ते कार्य अद्वितीय आहे. एका सर्वसामान्य कुटुंबातून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवेपर्यंतचा इतिहास, या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे.
रत्नागिरी ही मधुभाईंची कर्मभूमी आहे. “रत्नागिरीने मला साहित्यिक म्हणून जगण्याचे सामाजिक भान दिले,” अशी भावना खुद्द मधुभाईंनी व्यक्त केली असून, म्हणूनच त्यांनी या वयातही रत्नागिरीत हा सोहळा घेण्यास पसंती दिली आहे. हा कार्यक्रम केवळ एक सत्कार नसून तो साहित्याचा दीपोत्सव ठरावा, अशी संकल्पना पालकमंत्री उदय सामंत यांनी मांडली आहे.
साहित्य क्षेत्रातील या लक्षणीय कार्यक्रमासाठी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, रत्नागिरी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त आमदार संजय केळकर, विश्वस्त रेखाताई नार्वेकर, प्रा. एल. बी. पाटील, अनुप कर्णिक हे उपस्थित राहणार आहेत.
कोकणच्या या सुपुत्राने केलेल्या कार्याचा सन्मान अनुभवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातील संस्थानी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या माध्यमातूनही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी रत्नागिरीकर मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार आहेत, तसेच कोकण मराठी साहित्य परिषद अंतर्गत सातही जिल्ह्यातील पदाधिकारी, सभासद उपस्थित राहणार आहेत.
मागील अनेक दिवस नामदार उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुकाणू समितीचे नमिता कीर, प्रदीप ढवळ, शिल्पाताई सुर्वे, प्रकाश दळवी, आबा पाटील, आनंद शेलार, अभिजित हेगशेट्ये, संतोष तावडे, चंद्रमोहन देसाई यांच्यासह कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
हा सोहळा रत्नागिरीच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून जिल्ह्यातील रसिक, तरुण लेखक आणि नागरिकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. साहित्य क्षेत्रांतील या स्तुत्य कार्यक्रमासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढविण्याचे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला युवाशक्तीचे अरुण मोर्ये, जयू भाटकर, जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, डॉ. समिधा गोरे, विनायक हातखांबकर यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.




