
महाराष्ट्रासह कोकणात गंडा घालणाऱ्या टीडब्ल्यूजे कंपनीने संभाजीनगर मध्ये गुंतवणूकदारांना घातला तब्बल ४.३३ कोटींचा गंडा
परताव्याचे आकर्षक आमिष दाखवून ट्रेड विथ जाझ ग्रुप ऑफ कंपनीने (टीडब्ल्यूजे) संभाजीनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह ४० हून अधिक गुंतवणूकदारांना सुमारे ४ कोटी ३३ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. १८) तब्बल २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.
आरोपी समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, अमित बालम, किरण कुंडले, मुनाफ मुकादम, स्वप्निल पवार, सुकश धाग, सिध्देश पाटील, प्रसन्न करंदीकर, महान कोरगांवरकर, सुरज सुकासने, प्रणव बोर्डे, स्वप्निल देवळे, सौरभ बोर्डे, माहेश्वरी पाटणे, रघुवीर महाडीक, देवा घाणेकर, अमित जाधव, सिचन पाटील, अविनाश कदम, प्रतिक जासुतकर, रोहित म्हस्के, योगेश सपकाळ, सागर मंचेलवार अशी आरोपींची नावे आहेत.
कंपनीचे प्रमुख समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी शेवाळे यांना त्यांच्या १० सिस्टर कंपन्यांची माहिती देऊन विश्वासात घेतले. महाराष्ट्रात १२०० कोटींची गुंतवणूक असल्याचा दावा केला होता. सुरक्षेसाठी ५०० रुपयांच्या बाँडवर करारनामा आणि पोस्ट डेटेड चेक देऊन विश्वास संपादन केला जात असे. शेवाळे यांनी स्वतः २९ लाख रुपये गुंतवले होते, ज्यावर सुरुवातीला परतावा मिळाला, मात्र फेब्रुवारी २०२५ पासून परतावा देणे बंद करण्यात आले.
शेवाळे यांच्यासह ३८ लोकांच्या फसवणुकीचा आकडा ४ कोटी ३३ लाखांच्या घरात गेला आहे. तक्रार करण्यासाठी गेलेल्या गुंतवणूकदारांना मनजर सागर मंचेलवार आणि योगेश सपकाळ यांनी पोलिसांकडे तक्रार केली तर पैसे मिळणार नाहीत, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार करत आहेत.
बड्या हॉटेलमध्ये सेमिनार आणि फसवणूक
ऑक्टोबर २०२४ मध्ये हॉटेल ग्रीन लीफ येथे कंपनीने मोठा सेमिनार आयोजित करून अनेक नवीन गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले होते. गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावला असता, सिंगापूरवरून १००० कोटी येणार आहेत, अशी थाप मारून वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर कार्यालय बंद करून आणि फोन उचलणे बंद केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले.
राज्यभरात गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा
संभाजीनगरच नव्हे, तर पुणे, मुंबई आणि कोकण पट्ट्यातही या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांना 2 कोट्यवधींचा गंडा घातला आहे.




