मलंगगडावर मोठी दुर्घटना टळली! क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ‘फ्युनिक्युलर ट्रॉली’ अधांतरी अडकली


नुकतेच लोकार्पण झालेल्या मलंगगडावरील देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर ट्रॉलीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने खळबळ उडाली आहे.क्षमतेपेक्षा जास्त भाविक भरल्यामुळे ही ट्रॉली वाटेतच अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, ट्रॉलीमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मलंगगडावर सध्या यात्रेचा उत्साह असल्याने भाविकांची मोठी गर्दी आहे. आज दुपारच्या सुमारास भाविकांनी गच्च भरलेली ट्रॉली गडाच्या दिशेने जात असताना अचानक तांत्रिक बिघाड होऊन वाटेतच थांबली. जमिनीपासून उंचावर ट्रॉली अडकल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला.विशेष म्हणजे गेल्या सोमवारी काही व्हीआयपी व्यक्तींच्या दौऱ्यावेळीही ही ट्रॉली बंद पडली होती,ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यात्रेमुळे भाविकांची संख्या प्रचंड होती. ट्रॉलीच्या विहित क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवल्यामुळे यंत्रणेवर ताण आला आणि ट्रॉली मध्येच अडकली. सुदैवाने कोणताही मोठा अपघात झाला नसला तरी, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे भाविकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

जानेवारी २०२६ मध्ये भाजप आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडले.२००४ मध्ये प्रस्ताव मांडला, २०१२ मध्ये कामाला सुरुवात झाली.स्वित्झर्लंडच्या धर्तीवर बांधलेली देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे.दोन डब्बे असून तासाला १२०० प्रवासी नेण्याची क्षमता.सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘सुप्रीम सुयोग फ्युनिक्युलर रोपवेज’ कंपनीकडे व्यवस्थापनाची जबाबदारी.

दोन तासांची कठीण चढण वाचवण्यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली होती, मात्र सुरुवातीच्या काही दिवसांतच अशा घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. सध्या बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button