
भरधाव ट्रेलर २० फूट खोल खड्ड्यात पलटी; चालकावर गुन्हा दाखल.
चिपळूण : मुंबई–गोवा महामार्गावरील परशुराम घाटात भरधाव वेगातील ट्रेलर नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २० फूट खोल खड्ड्यात पलटी झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी ट्रेलर चालकावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रवनराम हुकमाराम बिश्नोई (वय ४६, रा. राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सुशील कुमार नंदराम शर्मा (वय ३५, रा. अहमदाबाद) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रवनराम बिश्नोई हा त्याच्या ताब्यातील ट्रेलरसह मुंबई–गोवा महामार्गाने गोव्याकडे जात होता. सोमवारी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास पेढे येथील परशुराम घाट उतरत असताना ट्रेलरवरील नियंत्रण सुटले. सवतसडा वळणाच्या पुढे रस्त्यावरील दिशादर्शक फलकाच्या खांबाला जोरदार धडक देत ट्रेलर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला.
या अपघातात चालक श्रवनराम बिश्नोई जखमी झाला असून, त्याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




