
बिबट्याचा घरात घुसून जीवघेणा हल्ला
राजापूर तालुक्यातील मूर या गावी बिबट्याने हल्ला करून रविंद्र भांबाडे यांना गंभीर जखमी केले. या घटनेत मूर, वाळवड, काजिर्डा, कोळंब, तळवडे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना बुधवारी रात्री १२ ते १२.३० दरम्यान घडली.
भांबाडे हे कोळंब तिठा येथील घरामध्ये एकटेच राहतात. त्यांच्या घराजवळच जंगलमय रान, झाडी असल्याने बिबट्याचा नेहमीच या परिसरात मुक्त संचार सुरू असतो. बुधवारी रात्री कुत्रा भुंकू लागल्याने भांबाडे घराचे दार उघडून बाहेर पहावयास गेले. त्याच दरम्याने बिबट्याने थेट घरामध्ये घुसून कुत्र्यावर झडप घातली. त्यावेळी कुत्र्याला वाचविण्यासाठी भांबाडे यांनी प्रयत्न सुरू केला. परंतु बिबट्याने कुत्र्याला सोडले आणि भांबाडे यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती शेजारच्या लोकांना मिळताच त्यांनी आरडाओरडा केली. त्यामुळे बिबट्या भांबाडे यांना सोडून बाजूच्या जंगलात पसार झाला. हल्ल्यात भांबाडे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रूग्णालय रायपाटण येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने मूर परिसरातील गावांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
www.konkantoday.com




