
बावनदीत हातखंबा येथील तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी शहरानजीक बावनदी येथे पोहण्यासाठी गेलेल्या हातखंबा येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज सोमवारी दुपारी घडली.सचिन सुरेश सनगरे (रा. हातखंबा-सनगरेवाडी) असे या मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे संपूर्ण हातखंबा परिसरात शोककळा पसरली आहे.
हातखंबा सनगरेवाडी येथील सचिन सुरेश सनगरे आणि मिलिंद पांडुरंग सनगरे हे दोघे सोमवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ‘गावात जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र, गावात न जाता ते थेट बावनदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. बावनदी धरणाच्या खालच्या बाजूला आणि पुलाच्या वरील भागात असलेल्या एका खोल डोहात सचिन सनगरे पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्यांना पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने ते बुडू लागले. ही बाब लक्षात येताच किनाऱ्यावर असलेल्या मिलिंद सनगरे याने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने नदीकडे धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने सचिन सनगरे याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला




