
प्रसिद्ध पर्यटन स्थळ माथेरानमधील प्रदूषण कारखान्यांमुळे नाही तर घोड्यांमुळे होत असल्याची धक्कादायक बाब समोर
प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील प्रदूषण कारखान्यांमुळे नाही तर घोड्यांमुळे होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हरित लवादाने गठीत केलेल्या तज्ज्ञाच्या समितीने माथेरानमध्ये फिरणाऱ्या घोड्यांमुळेच प्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढत पालिका हद्दीबाहेर घोडे आणि त्यांच्या पागा हटविण्याची महत्वपूर्ण शिफारस केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून तज्ज्ञाच्या अहवालावर हरित लवाद कोणती भूमिका घेते याकडे माथेरानमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने सन २००५ मध्ये माथेरान पर्यावरणीयदृष्टया संवेदनशील म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे तेथे वाहने, उद्योग यांना बंदी आहे. केवळ घोडे. टांगा यांच्या माध्यमातूनच माथेरानमध्ये लोकांची ये-जा होत असते. माथेरानमध्ये सुमारे ४६० घोडे असून त्यांची सुमारे तीन टन लीड-शेण रस्त्यावर,अन्यत्र फेकून दिले जाते. प्रदूषण होऊ नये यासाठी उद्योग, कारखाने, चारचाकी वाहनांना बंदी असतानाही शहरात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्यानंतर पर्यावरण विभागाने सन २०१५ मध्ये तज्ज्ञांच्या अभ्यासगटाची नियुक्ती केली होती.
पर्यावरण तज्ज्ञांनी ग्रासरुट संस्थेच्या माध्यमातून माथेरानचा पर्यावरणीय व्यवस्थापन आराखडा तयार केला. त्यात माथेरानमधील प्रदूषण प्रामुख्याने घोड्यांची लीड आणि दरड मातीच्या रस्त्यावरुन उडणाऱ्या धुळीमुळे होत असल्याची बाब निदर्शनास आणली होती. मात्र केल्या काही वर्षात प्रशासनाने त्यावर कोणताची कार्यवाही केली नाही म्हणून सुनील शिंदे आणि केतन रमाने या स्थानिक नागरिकांनी माथेरानमधील प्रदूषणाबाबत हरित लवादाच्या पश्चिम विभाग खंडपीठात याचिका दाखल केली होती. न्या. दिनेश सिंग आणि सुजित वाजपेयी यांच्या खंडपीठाने या याचिकेची दखल घेत माथेरानमध्ये प्रदूषण कशामुळे होते याचा अभ्यास करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि माथेरान नगरपालिका यांची संयुक्त समिती गठीत केली होती. या समितीने अन्य पर्यावरण तज्ज्ञांच्या साह्याने माथेरानमध्ये मान्सून पूर्व, मान्सूनमध्ये आणि मान्सून पश्चात अशा तीन टप्यात सर्वेक्षण आणि अभ्यास करुन आपला अहवाल हरित लवादास सादर केल आहे.
शुक्रवारी हरित लवादासमोर झालेल्या सुनावणीत हा अहवाल मांडण्यात आला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. समितीने माथेरानमध्ये विविध ठिकाणी जाऊन हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन मान्सूनपूर्व, मान्सून आणि मान्सूनोत्तर या तिन्ही टप्प्यांमध्ये केले होते. त्यातून लोकांच्या आरोग्यास घातक अशा अतीसूक्ष्म कणांची ( PM₂.₅ आणि PM₁₀) ची पातळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मानकांचे उल्लंघन करणारी पातळी असल्याचे दिसून आले आहे. याचे मूळ कारण घोड्याच्या(लीड) शेणाचा धूर आणि कच्च्या रस्त्यांवरील धूळ हे आहे. माथेरानमधील वायू प्रदूषण औद्योगिक नाही, तर ते घोड्याच्या लीड आणि माल मातीच्या धुळीमुळे होत असल्याचे या अहवात नमुद करण्यात आले आहे.
जलप्रदूषणाच्या बाबतीतीतही समितीने विविध ठिकाणाहून गोळा केलेल्या पाण्याच्या नमुन्यांमध्ये प्रदूषण आढळून आले असून घोड्यांच्या लीडमूळे हे जलस्त्रोत प्रदूषित होत असल्याचे आढळून आले आहे. माथेरानमधील घोड्यांमुळे पावसाळ्यात पर्यावरणाला आणि सार्वजनिक आरोग्याला सर्वाधिक धोका निर्माण होत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.
यानुसार माथेरानमधील प्रदूषण रोखण्यासाठी घोड्यांच्या संख्येचे कठोर नियमन आणि टप्प्याटप्प्याने कपात करावी, घोड्यांच्या पागांचे पर्यावरण-संवेदनशील क्षेत्राच्या हद्दीबाहेर स्थलांतर करावे. मार्गांचे झोनिंग आणि पाणलोट क्षेत्रांचे संरक्षण करावे. माथेरानमधून घोड्यांच्या पागा हलविल्यानंतर आणि घोड्यांच्या संखेवर नियंत्रण आणल्यांतर प्रदूषणावर होणाऱ्या परिणामांची पडताळणी करण्यासाठी ३-५ वर्षांसाठी सतत देखरेख करावी अशा शिफारसी समितीने केल्या आहेत. तसेच या शिफारशीनुसार अंमलबजावणी केल्यास, माथेरान हे वैज्ञानिकदृष्ट्या व्यवस्थापित, केवळ पादचाऱ्यांसाठी असलेल्या पर्यावरण-पर्यटनाचे एक राष्ट्रीय आदर्श मॉडेल म्हणून विकसित होऊ शकते असेही या अहवालात म्हटले आहे.




