देवरुख साखरपा परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या दोन धक्कादायक घटना


देवरुख साखरपा परिसरात ऑनलाईन फसवणुकीच्या दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या असून, केवळ मोबाईलवर आलेली लिंक उघडल्यामुळे बँक खात्यातील रक्कम परस्पर लंपास झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे तक्रार केल्यानंतरही संबंधित बँकांकडून असमर्थता दर्शविण्यात आली आहे.
भडकंबा पेठवाडी (ता. संगमेश्वर) येथील संजय उर्फ बाळू शिंदे यांना गेल्या आठवड्यात व्हॉट्सऍपवरून एक संदेश प्राप्त झाला. त्या संदेशातील एका लिंकवर त्यांनी क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या साखरपा शाखेतील खात्यातून २२ हजार ५०० रुपये परस्पर काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कोणताही ओटीपी अथवा पूर्वसूचना न मिळाल्याने हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेत धाव घेतली.
याच प्रकारची दुसरी घटना साखरपा येथील ऋषी पावसकर यांच्याबाबत घडली आहे. त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या देवरुख शाखेतील खात्यातून २० हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आले. दोघांनीही आपापल्या बँकेत लेखी तक्रारी दाखल केल्या असता, ठोस पुरावा नसल्याने पैसे परत मिळण्याबाबत बँकेने असमर्थता दर्शविली. अशा प्रकारचा शोध कसा घ्यायचा, हा प्रश्नच बँक प्रशासनापुढे उभा राहिल्याचे सांगण्यात आले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button