
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुणासाठी ऑनलाईन सुविधा
रत्नागिरी, दि. 27 ):- क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे ग्रेस मार्क मिळविण्याची ऑनलाईन सुविधा अधिकृतपणे सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुणाचा फायदा मिळणार असून शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाना प्रस्ताव ऑनलाईन सादर करावे लागणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी पात्र खेळाडूचे अर्ज १० एप्रिल २०२६ पर्यंत आपले सरकार या अधिकृत संकेत स्थळावर ग्रेस गुण सवलतीचा अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या शैक्षणिक वर्षात सवलतीचे गुण मिळावे यासाठी ही सूविधा आपले सरकार (URL:https://aaplesarkar.mahaonline.gov.in) या संकेत स्थळावर मागील वर्षीपासून उपलब्ध करून दिली आहे. क्रीडा संचालनालयाच्या अधिकृत संकेत स्थळावर (https://sport.maharashtra gov in) आपले सरकार पोर्टलची लिंक ग्रेस मार्क या टॅब अतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र खेळाडू विद्यार्थ्यांना सदर पोर्टलवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे सवलत गुण मिळविण्याकरीता अर्ज करताना खेळाडू विद्यार्थ्यांनी खेळाडूंचे परीक्षा बैठक क्रमांक, फॉर्म नं १ व २, बारावी साठी अर्ज करीत असल्यास इयत्ता दहावीचे गुणपत्रक, क्रीडा प्रमाणपत्र ज्या खेळाच्या आधारे सवलतीचे गुण हवे आहेत. त्या खेळाचे अधिकृत जिल्हास्तरीय, विभागस्तरीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.




