
तंजावरमधील इतिहास हा प्रत्येक मराठी माणसाचा : श्रीमंत बाबाजीराजे भोसले
ॲड. विलास पाटणे यांच्या श्रीमंत सरफोजीराजे भोसले तंजावर" पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन
रत्नागिरी : तंजावरमधील इतिहास हा केवळ भोसले घराण्याचा नसून केवळ स्थापत्य, मंदिर, कला यांच्याशीच निगडीत नसून, तो प्रत्येक मराठी माणसाचा आहे, असे सांगतानाच आपल्या भावी पिढीला आपल्या वैभवशाली इतिहासाची माहिती होण्यासाठी तंजावर नक्की दाखवा, असे आवाहन श्रीमंत बाबाजी राजे भोसले यांनी केले.
ॲड. विलास पाटणे लिखित “सरफोजीराजे भोसले तंजावर” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल (२२ फेब्रुवारी) सायंकाळी हॉटेल विवेक येथे दिमाखात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लेखक ॲड. विलास पाटणे यांच्यासह कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पानिपतकार विश्वास पाटील, प्रकाश पराग पिंपळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, डॉ. कल्पना मेहता उपस्थित होत्या.
श्रीमंत बाबाजीराजे भोसले यांनी आपल्या आईसाहेबांचे आजोळ कोकण असल्याचा उल्लेख करत इथे येऊन अभिमान वाटल्याचे सांगितले. सरफोजीराजे यांनी तंजावरमध्ये ३४ वर्ष राज्य केले. राजांच्या आयुष्याचा अभ्यासपूर्ण वेध घेत तंजावरच्या सुवर्णकाळावर प्रकाश टाकला आहे. हे पुस्तक दक्षिणेतील विस्तारित मराठा वंशाशी महाराष्ट्राला जोडण्याचे काम पुल म्हणून काम करील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तंजावर हे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, टिपू सुलतान, निजाम यांच्यामुळे चारही बाजूंनी खिंडीत सापडल्यासारखे होते; मात्र यातूनही हे मराठी वैभव टिकवणे म्हणजे केवळ दैवी कृपा आहे. आपल्या राजांनी काय केले आहे, हे पाहण्यासाठी, तिथले वैभव अनुभवण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे आजही आपली संस्कृती तंजावर मध्ये कशाप्रकारे जिवंत आहे हे पाहण्यासाठी तंजावरला नक्की भेट द्या, असे श्रीमंत बाबाजीराजे यांनी आवर्जून सांगितले.
तसेच या पुस्तकातही तंजावर येथे मुक्कामी राहून सरफोजीराजे यांच्याबद्दल अनेक संदर्भ गोळा करून ते नेमकेपणाने मांडण्याचे काम ॲड. पाटणे यांनी केले असून, त्यांच्या या कार्याचा त्यांनी विशेष गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. पाटील यांनी ॲड. पाटणे यांनी लिहिलेले हे पुस्तक आजची सर्वात मोठी उपलब्ध असल्याचे नमूद केले. तंजावरची यशाची परंपरेची गुढी आहे तिला तोड नाही. मराठी आणि त्यांचा दक्षिणेवरचा प्रभाव हा नेहमीच संशोधनाचा विषय असे सांगतानाच शहाजीराजे भोसले घराण्याचा इतिहास आपल्या उगवत्या शैली उपस्थितांसमोर मांडला. इतिहासात तंजावरचे महत्त्व मोठे असून हा इतिहास जपण्याचे मोठे काम ॲड. पाटणे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे. आपण सर्वच छत्रपतींवर प्रेम करतो. म्हणून केवळ त्यांचे स्मारक बांधून चालणार नाही तर छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी, सरफोजी राजे कोण होते हा इतिहास जाणला पाहिजे तरच आपण खऱ्या अर्थाने शिवप्रेमी म्हणून घेऊ. आणि हा इतिहास प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तरापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत श्री. पाटील यांनी इतिहासातील अनेक दाखले दिले.
ॲड. पाटणे यांनी दूरदर्शी, विद्वान सरफोजीराजांनी तंजावरमध्ये मराठीचा झेंडा फडकवित ठेवला त्यांची ओळख महाराष्टातील मराठी जनतेला होण्यासाठी आपण या पुस्तकाकडे वळलो, असे सांगितले. सरस्वती महालातील १७ भाषेतील ३ लक्ष ग्रंथ आपण जतन केले पाहिजेत. तसेच सरस्वती ग्रंथालयातील समृद्ध वारसा आपण टिकवला पाहिजे, असे ते म्हणाले.
यानंतर नरेंद्र जाधव यांनीही अभ्यासपूर्ण विचार मंथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वापेठे प्रास्ताविक डॉ. कल्पना मेहता, तर आभार प्रदर्शन ॲड. राजशेखर मलुष्टे यांनी केले.



