डॉ. संतोष सावर्डेकर यांची रत्नागिरीच्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

रत्नागिरी : दापोलीतील डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष सावर्डेकर यांनी कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला नुकतीच सदिच्छा भेट देऊन प्रशासकीय बाबी आणि चालू असलेल्या संशोधन आणि विस्तार कार्याचा आढावा घेतला. तसेच संशोधन केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले.
सर्वप्रथम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी डॉ. संतोष सावर्डेकर यांचे स्वागत केले. डॉ. सावर्डेकर यांनी संशोधन केंद्राच्या झाडगाव येथील प्रशासकीय बाबी, मत्स्यालय व मत्स्य संग्रहालय, विस्तार शिक्षण आणि संशोधन कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. संशोधन केंद्रावर नवीन चालू केलेल्या ‘प्लवंग संवर्धन प्रकल्प’ बाबत माहिती घेऊन त्यांनी उपस्थित शास्त्रज्ञांना मार्गदर्शन केले. त्यांनी संशोधन केंद्रावर चालू असलेल्या महसुली उत्पादन प्रकल्पाबाबत प्रशंसा व्यक्त केली तसेच महसुली उत्पन्न वाढीकरिता नवीन कल्पनांचा विचार करण्याचे सुचविले. संशोधन केंद्राची पेठकिल्ला, रत्नागिरी येथील नवीन इमारतीच्या बांधकामाबाबतही चर्चा केली.
यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन अधिकारी व प्रा. डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक व प्रा. डॉ. हरीश धमगाये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही. आर. सदावर्ते व श्रीमती अपूर्वा सावंत, वरिष्ठ लिपिक श्रीमती जाई साळवी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button