
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्जजिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणीमतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे- मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. 6 ):- जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजता मतदान होत आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी आज नाचणे येथील जि. प. प्राथमिक शाळा नाचणे क्र. 1 या मतदान केंद्रांवर भेट देवून तयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई, गटविकास अधिकारी चेतन शेळके, ग्रामविकास अधिकारी गणपत खरंबेळे, मंडळ अधिकारी प्रतापसिंह पोळ, ग्राम महसूल अधिकारी सुरेश जाधव हे उपस्थित होते. सुरक्षा व्यवस्था, मतदान पथके, मतदारांची संख्या, पाणी सुविधा, मतदार सहाय केंद्र, मंडप सुविधा आदीबाबत निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देसाई यांच्याकडून माहिती घेतली.
मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महिला व दिव्यांग मतदारांसाठी सुरक्षित व सुलभ वातावरण उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. मतदानासाठी येताना सोबत ओळखपत्र आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. या मतदान केंद्रातील मतदानासाठी असलेली व्यवस्था उत्तम आहे. यासाठी पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.



