
जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो स्पर्धेला भरघोस प्रतिसाद
रत्नागिरी : १९ व्या जिल्हास्तरीय खुल्या तायक्वांदो आणि पुमसे स्पर्धेला जिल्हाभरातील खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ६, ७, ८ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा मारुती मंदिर येथील जिल्हा क्रीडा संकुलात झाल्या.
या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून सुमारे ६०० स्पर्धक विविध गटात सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाची जबाबदारी रत्नागिरी तायक्वांदो संघाच्या सर्व पालकांनी मिळून घेतली आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष व्यंकटेश कररा, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, खजिनदार शशांक घडशी, रत्नागिरी तायक्वांदो संघाचे मयूर धुळप, तसेच डॉ. प्रियांका कांबळे, सोनाली आयरे हे उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत अमोल गराटे, राम करा, गुरुप्रसाद सावंत, अमित जाधव, शशिरेखा कररा, तन्वी साळुंखे यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, शिवरायांची प्रतिमा पूजन, श्रीफळ वाढवून कोर्टच उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आणि या स्पर्धेच्या आयोजनात महिला पालकांनी सक्रिय आणि नियोजनबद्ध योगदान दिल्याबद्दल अभिनंदन केले.




