जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी अध्यात्माच्या माध्यमातून मानवतेची सेवा करत आहेत : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

रत्नागिरी : जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी केवळ आध्यात्मिक मार्गदर्शन न करता, अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मानवतेचीही सेवा करत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी नाणीजधाम येथे केले.

संत शिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकट दिन व आद्य जगदगुरु रामानंदचार्य यांच्या जयंती निमित्त श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे भव्य उत्सव व मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम परमपूज्य कानिफनाथ महाराज, जिल्हाधिकारी मनोज जिंदाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जाधव, रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले, जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांनी ‘धर्मसेवेसोबतच समाजसेवेलाही तितकेच महत्त्व दिले आहे’ राज्याचा आरोग्य विभाग व नाणीजधाम संस्थान यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विशेष रक्तदान मोहिमेत अवघ्या १५ दिवसांत १ लाख ७१ हजार १५० रक्तपिशव्यांचे विक्रमी संकलन करण्यात आले. या ऐतिहासिक जनसेवेबद्दल आरोग्यमंत्र्यांनी नरेंद्राचार्यजी यांचा महासन्मान केला. नरेंद्रचार्यजी यांनी रक्तदान, अवयवदान आणि देहदानाचे महत्त्व समाजात रुजवून एक सशक्त समाज घडवण्याचे प्रेरणादायी कार्य करत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

प. पू. कानिफनाथ महाराज यावेळी म्हणाले की, महारक्तदान शिबिरात संकलित रक्तामुळे हजारो रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, आरोग्य विभागाचे सहकार्य, नाणीज संस्थान व उप पिठातील भाविकांच्या सहभागामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तसंकलन करणे शक्य झाले. या शिबिरामुळे रक्तदानाबाबत समाजात मोठी जनजागृती झाली असून, आध्यात्मिक शक्तीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी कसा करता येतो, याचा आदर्श या निमित्ताने समोर आला आहे.

यावेळी संस्थानच्या वतीने राज्याचे आरोग्यमंत्री, उद्योग मंत्री व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शिबीर व उत्सव सिद्धिस नेणाऱ्या भक्तगणांचा गौरव करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button