चिपळूण नगर परिषदेच्या दोन्ही इमारती पाडणार असल्याने बीएसएनएल कार्यालयातून हाकणार कारभार


चिपळूण नगर परिषदेच्या दोन्ही इमारती पाडून त्या जागी नवी भव्य इमारत उभारण्याला सर्व नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या विशेष सभेत सहमती दिली आहे. मात्र दुसरी जुनी इमारत पाडल्यानंतर त्याचे कोरीव दगड नव्या इमारतीत जतन करुन ठेवण्यावर एकमत झाले. नव्या इमारतीचे काम करताना प्रशासकीय व राजकीय कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बीएसएनएलच्या इमारतीत नेण्यावर चर्चा झाली. मात्र तरीही नागरिकांना सोईच्या अन्य जागांचा शोध घेण्यासह पावसाळ्यापूर्वी स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्या उपस्थितीत डिबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात ही सभा झाली. नगर परिषदेच्या दोन इमारतींना बरीच वर्षे झाली आहेत. त्यामुळे आता दोन्ही इमारती पाडून त्या जागी नवी भव्य इमारत बांधण्यात येणार असून नवी इमारत तीन मजली होणार आहे.
नियमानुसार खाली पार्किंग राहणार आहे. नव्या आराखड्यानुसार या इमारतीसाठी १२ कोटी १७ लाख रुपये खर्च येणार आहे. यातील ११ कोटी शासनाने मंजूर केले असून उर्वरित १ कोटी १७ लाख रुपये नगर परिषद आपल्या फंडातून खर्च करणार आहे. फर्निचरसाठी पालकमंत्री उदय सामंत १ कोटी रुपये देणार आहेत. पूर्वी या इमारतीचा २८ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र निधीचा विचार करता त्यात आता बदल करण्यात आला असून नवा प्रस्ताव तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेसाठी संबंधित विभागांकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button