
चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी 50.47 टक्के मतदान
सकाळच्या सत्रात अनेक मतदान यंत्रे बंद, मतदानाची वेळ वाढवली
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शनिवारी चिपळूण तालुक्यात मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गणांसाठी मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 50.47 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
चिपळूण तालुक्यात यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती पाहायला मिळाल्या. सावर्डे जिल्हा परिषद गटात आमदार शेखर निकम यांच्या पत्नी पूजाताई निकम यांच्याविरोधात माजी सभापती धनश्रीताई शिंदे यांच्यात चुरशीची लढत होत आहे.
आलोरे जिल्हा परिषद गटात माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद झगडे हे पंचायत समितीसाठी, तर त्यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवीत आहेत. तालुक्यात अनेक ठिकाणी महत्त्वपूर्ण लढती होत असल्याने चिपळूणच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार 92 हजार 698 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण मतदानाची टक्केवारी 50.47 इतकी असल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, सकाळच्या सत्रात काही ठिकाणी मतदान यंत्रे बंद पडल्याने मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले.
मालदोली, चिंचघरी, ओमळी व कापसाळ येथील काही मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडली होती. संबंधित ठिकाणी मतदान केंद्रांचा वेळ वाढवून देण्यात आला. मात्र यंत्रे बंद असल्याने काही मतदारांनी कंटाळून घरी परतणे पसंत केले.
भाजपचे माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांच्या डाव्या हाताच्या बोटाऐवजी उजव्या हाताच्या बोटाला शाई लावण्यात आल्याची घटना घडली. यावर त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना अधिक प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
एकूणच चिपळूण तालुक्यात सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.




