
चिपळुणातील हॉस्पिटलमधून लाखांची चोरी करणारा चोरटा चार तासात जेरबंद
चिपळूण शहरातील मार्कंडी येथील एच.आर. वुमन हॉस्पिटल येथे काऊंटर टेबलच्या ड्राव्हरमधून एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरीस गेल्याची घटना गुरूवारी सकाळी सुमारे ७.५३ वाजता घडली. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला वेग देत अवघ्या चार तासातच या चोराला अटक केली असून चोरीची संपूर्ण रक्कमही जप्त करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान अख्तर हुसेन अन्सारी (वय ४१, रा. मुंब्रा ठाणे) असे आहे.
अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. याबाबत अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीच्या तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम आढाव, विकास निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल वृशाल शेटकर, संदीप माणके, पोलीस नाईक रोशन पवार, पोलीस शिपाई शैलेश वनगे, रुपेश जोगी आदींच्या पथकाने वेगाने तपास करत यशस्वी कामगिरी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्याचा माग काढण्यात आला.
www.konkantoday.com




