गोवळकोटमधील आरक्षण रद्द प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक

नगर परिषदेला निवेदन; नगराध्यक्षांकडून सकारात्मक निर्णयाचे आश्वासन

चिपळूण : शहरातील गोवळकोट येथील प्राथमिक शाळा व मैदानासाठी शहर विकास आराखड्यात राखीव असलेल्या जागेवरील आरक्षण नगर परिषदेने रद्द करू नये तसेच ही जागा तातडीने विकसित करावी, अशी मागणी मंगळवारी ग्रामस्थांनी नगराध्यक्ष उमेश सकपाळ व मुख्याधिकारी संजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी शंभरहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षरी असलेले निवेदन सादर करण्यात आले.

निवेदन सादर करताना ज्येष्ठ ग्रामस्थ वसंत हरवडे, विजय खापरे, दीपक निवाते, संदीप बांद्रे आदी उपस्थित होते.

गोवळकोट येथील स्वयंभू गणपती मंदिराशेजारील मालमत्ता सर्वे क्रमांक १७०/३ब (शहर सर्वे क्रमांक ७८२) ही जागा आरक्षण क्रमांक १५ व १६ अंतर्गत प्राथमिक शाळा व मैदानासाठी राखीव आहे. मात्र या जमिनीचे मालक अस्मा अहमद खतीब व अहमद अन्वर खतीब यांनी आरक्षण रद्द करण्यासाठी अथवा जमिनीचा मोबदला मिळवण्यासाठी राज्याच्या नगररचना विभागाकडे उच्च न्यायालयाच्या वकिलामार्फत अर्ज केला आहे.
या अर्जाच्या अनुषंगाने नगर परिषदेने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून शहरातील नागरिकांना हरकती नोंदविण्याबाबत महिन्याची मुदत दिली आहे.
त्यास अनुसरून गोवळकोट परिसरातील ग्रामस्थांनी एकत्र येत आरक्षण रद्द करण्यास तीव्र हरकत घेत निवेदन दिले आहे.
यावेळी ग्रामस्थांनी नगर परिषदेकडे मागणी केली की, संबंधित जमीन मालकांना शक्य असल्यास वाढीव दराने तातडीने मोबदला द्यावा; मात्र गोवळकोट व परिसरातील भविष्यातील शैक्षणिक व क्रीडा गरजा लक्षात घेता आरक्षण रद्द करू नये.

यावर मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले की, प्रशासन जमीन मालकांच्या अर्जानुसार व नगररचना विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही करत आहे; मात्र ग्रामस्थांच्या भावना नक्कीच विचारात घेतल्या जातील.
नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी सांगितले की, शहरातील प्राथमिक शाळा सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कमी पटसंख्येमुळे अनेक शाळा अडचणीत आहेत. ओझरवाडी येथील प्राथमिक शाळेत इंग्रजी माध्यमाचा प्रयोग यशस्वी ठरला असून त्या शाळेची पटसंख्या सव्वाशेच्या पुढे गेली आहे. याच धर्तीवर गोवळकोट येथेही इंग्रजी माध्यमाचा प्रयोग करण्यात येईल. या आरक्षणाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button