
खारेपाटण दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार पराग मोहिते यांचे निधन
कणकवली पोलीस दलावर शोककळा
कणकवली : मूळचे आंबेड बुद्रुक (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले आणि सध्या सिंधुदुर्ग पोलीस दलात सेवा बजावत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते (वय ३९) यांचे मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग पोलीस दलातील एक मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
पराग मोहिते हे २६ डिसेंबर २०१२ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. गेल्या काही वर्षांपासून ते कणकवली पोलीस ठाण्यांतर्गत आपली सेवा बजावत होते. २९ सप्टेंबर २०२० पासून त्यांची नेमणूक कणकवली पोलीस ठाण्यात झाली होती आणि सध्या ते खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे कार्यरत होते.
अत्यंत सुस्वभावी आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सर्वत्र सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई व वडील असा परिवार असून, त्यांच्या जाण्याने मोहिते कुटुंबासह पोलीस दलाचीही मोठी हानी झाली आहे.




