
कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात लवकरच मोर्चा
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून लवकरच परिषद व मोर्चा काढला जाणार आहे. त्याच्या तयारीसाठी गावागावात होत असलेल्या बैठकांना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, सरकार आणि सरकारी अधिकारी यांच्या आशीर्वादानेच ही कंपनी सुरू झाली असून तेथे घातक असलेल्या पिफासचेही उत्पादन घेतले जात आहे. याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. तरीही काही दिवसांपूर्वी येथे आलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कंपनी कोकणसाठी हानिकारक असेल तर ती बंद केली जाईल असे सांगितले आहे. मात्र तसे काहीही होणार नसून जर सरकारला कंपनी घातक आहे की नाही हे समजून घ्यायचे असेल तर ते आमच्याशी चर्चा का करीत नाहीत, असा सवालही दलवाई यांनी उपस्थित केला.
आता सरकार काय करेल हे आमच्यासाठी महत्वाचे नसून आम्हीच आता सर्वांना बरोबर घेऊन एकत्रित लढा देऊन ही कंपनी बंद पाडण्यास भाग पाडणार आहोत, यासाठी आतापर्यंत आयनी, असगणी, दाभिळ, मेटे, कोतवली, घाणेकुंट, सात्विनगाव, लवेल, सोनगाक मालदोली या गावांमध्ये बैठका झाल्या असून ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या लढ्याला एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामस्थांना, एकत्र केल्यानंतर लगेचच घेण्यात येणा परिषदेत काही महत्वाचे ठराव करून ते शासनाला पाठवण्यात येणार असून कंपनीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढणार आहोत.www.konkantoday.com




