कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी ३०० कोटींच्या आराखड्यास अर्थसंकल्पात मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात यावा

आमदार शेखर निकम यांची मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी


कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय बनून राहिलेल्या संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारकासाठी ३०० कोटींच्या आराखड्यास अर्थसंकल्प २०२५-२६ मध्ये मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फक्त संगमेश्वरचा नाही. तर संपूर्ण महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा अमूल्य वारसा आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेले कार्य लढा व त्याग पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे आहे. या स्थळाचे ऐतिहासिक ओळख जतन करून ठेवणे गरजेचे आहे. मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय उपस्थित करून याविषयी संवाद साधला होता असे आ. निकम यांनी या पत्रात नमूद केले आहे.

तर या निवेदनात पुढे म्हटले आहे की, या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारकाच्या उभारणी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरी यांनी ३१३ कोटींचा आराखडा तयार करून शासनास सादर केला आहे. येथील सुमारे ५ एकर वास्तव जागा व नियोजित १०० एकर परिसर संपादित करून भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे अशी कोकणातील जनतेची मागणी आहे. हे स्मारक होणे येथील लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषय आहे.

या प्रस्तावित कसबा येथील स्मारकाच्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार तसेच पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसमवेत दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सकारात्मक भूमिका दर्शवली होती. त्याला आता १ वर्ष पूर्ण होईल. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात यावे, असे स्वर्गीय अजितदादा पवार यांची मनापासून इच्छा होती.

यासोबत शास्त्रीपुल ते शृंगारपूर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मार्गाचा सर्वांगीण विकास करण्यात यावा शृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराज यांची सासरवाडी असून या मार्गावर मालोची राजे घोरपडे कारभाटले यांची समाधी देखील आहे. संबंधित स्थळांचा राष्ट्रीय दर्जाने विकास केल्यास ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, तसेच कसबा परिसरात सुमारे ३०० पुरातन मंदिरे असून त्या सर्व परिसराचा एकात्मिक विकास आराखडा राबवण्यात आल्यास सांस्कृतिक व धार्मिक पर्यटनासाठी हे केंद्र ठरू शकते. त्याबरोबरच स्मारका नजीक शास्त्री नदीवरती कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ६६ कोटी २२ लाख ७३ हजार रकमेचे अंदाजपत्रक तयार करून शासनास सादर केले आहे. तरी आता होणाऱ्या अर्थसंकल्प २०२५-२६ च्या अधिवेशनात दोन्ही प्रस्तावित आराखड्यास मान्यता देऊन आराखड्यातील टप्प्यानुसार आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. जेणेकरून छत्रपती संभाजी महाराज यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीस लवकरात लवकर प्रारंभ करता येईल, असे आमदार शेखर निकम यांनी या निवेदनात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button