
कवी केशवसुत स्मारक,मालगुंड येथे मांडकी पालवण येथे दि.१३ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत होणाऱ्या ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाचे लोगो अनावरणाचा कार्यक्रम संपन्न
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी पालवण या संस्थेमार्फत दि.१३,१४ व १५फेब्रुवारी २०२६ रोजी शासन पुरस्कृत, राज्यस्तरीय ग्रामीण,कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन संस्थेच्या भव्य क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले आहे. सदर साहित्य संमेलनाचे लोगोचे अनावरण आज दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी कवी केशवसुत स्मारक,मालगुंड,रत्नागिरी येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा रत्नागिरी या शाखेच्या अध्यक्षा व रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा मा.सौ. शिल्पाताई सुर्वे यांचे हस्ते करण्यात आले. सौ शिल्पाताई यांनी ग्रामीण, कृषी व सहकार या ग्रामीण भागाशी निगडित असलेल्या एकत्रित तीन विषयांवर साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच भरविले जात असल्यामुळे सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. मा.शिल्पाताई सुर्वे यांची रत्नागिरी परिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा साहित्य संमेलनाचे संयोजन समितीकडून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी मालगुंड गावच्या सरपंच मा. सौ श्वेता थेऊर,साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, नियोजन समिती अध्यक्ष प्रकाश देशपांडे,प्रमुख कार्यवाह निखिल चोरगे,कोषाध्यक्ष अजय चव्हाण तसेच कवी केशवसुत स्मारकाच्या कार्यवाह नलिनी खेर उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाला प्रसंगी मा. शिल्पाताई सुर्वे यांनी मांडकी पालवण येथे होणाऱ्या साहित्य संमेलनासाठी सर्व साहित्य प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. साहित्य संमेलनाच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने साहित्य प्रेमी उपस्थित होते.




