
कणकवली येथील लॉज मध्ये पुण्याचा तरुण मृत अवस्थेत सापडला
कणकवली बस स्थानकासमोरील उत्कर्षा लॉजमध्ये दोन दिवसांपासून भाड्याने राहत असलेला एक तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची माहिती लॉजचे मालक नंदकुमार आरोलकर यांनी कणकवली पोलीस ठाणे येथे दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
मृत तरुणाचे नाव अलंकार अशोक नाईक (वय ३५, रा. कर्वेनगर, पुणे) असे असून तो १३ फेब्रुवारी रोजी कणकवली येथे आला होता. त्याने बसस्थानकासमोरील उत्कर्षा लॉजमध्ये राहण्यासाठी खोली आरक्षित केली होती. सकाळी लॉजमधील कामगार पार्थ रंजन पोयेकर हा भाड्याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित खोलीजवळ गेला असता दरवाजा आतून बंद असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने आवाज दिला, मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्याने मालक नंदकुमार आरोलकर यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी दरवाजा उघडून पाहणी केली असता अलंकार नाईक हा अचेत अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.




