
एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासले, मुंबई विमानतळावर थोडक्यात टळला भीषण अपघात!
अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी ताजी असतानाच आता मुंबई विमानतळावर एक मोठा अनर्थ टळला. मुंबई विमानतळावरील टॅक्सीवेवर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांचे पंख एकमेकांना घासल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाच्या टेक-ऑफपूर्वी आणि इंडिगो विमानाच्या लँडिंगनंतर टॅक्सींगदरम्यान दोन्ही विमानांच्या पंखांंचा परस्पर संपर्क झाला. या घटनेत सर्व प्रवासी सुरक्षित असून, दोन्ही विमान कंपन्यांनी अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
नेमकी घटना काय घडली?
एअर इंडियाचे AI2732 हे उड्डाण ३ फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोईंबतूरकडे जाणार होतं. टेक-ऑफपूर्वी हे विमान टॅक्सीवेवर थांबले असताना त्याचवेळी लँड झालेले इंडिगो विमान टॅक्सिंगसाठी त्या ठिकाणी येत होते. यावेळी इंडिगो विमानाच्या पंख्याची आणि एअर इंडिया विमानाच्या पंखांची एकमेकांना धडक बसली. मात्र ही धडक इतकी जोरात नव्हती की मोठा अपघात होईल. सुदैवाने दोन्ही विमानांमधील प्रवासी सुखरुप आहेत थोडक्यात मोठा अनर्थ टळला आहे.
एअर इंडिया विमानाच्या पंखाचं नुकसान
सदर धडकेनंतर एअर इंडियाच्या विमानाच्या पंखाचं म्हणजे विंग टीपचं नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले. त्यातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आले असून, त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं आहे. इंडिगोचं विमान हे हैदराबादहून मुंबईला पोहचलं होतं. लँडिंग झाल्यानंतर टॅक्सिंग दरम्यान ही घटना घडल्याचं इंडिगो कंपनीने स्पष्ट केलं. विमानाचे टॅक्सिंग केल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरविण्यात आलं आहे. संबंधित विमानाची देखभाल तपासणी केल्याची माहिती इंडिगोने दिली आहे. इंडिया टुडे ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची-एअर इंडिया
एअर इंडियाने म्हटलं आहे की, या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून, पुढील तांत्रिक तपासणीसाठी विमान थांबवण्यात आले आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे विमानातून उतरवण्यात आले असून, आमचे ग्राउंड कर्मचारी त्यांना लवकरात लवकर त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करत आहेत. आता या घटनेची माहिती नियामक प्राधिकरणाला देण्यात आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्यासाठी प्रवाशांची आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे.




