
अवकाळी पावसाचा अलर्ट अन् थंडी गायब, राज्यावर पुन्हा नवं संकट
सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे सध्या राज्यावर अवकाळी पावसाचं संकट आहे. राज्यात गारपिटीचा किंवा मुसळधार पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम अवकाळी पावसानंही मोठं नुकसान होत आहे. केरळच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. तर उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्सचा धोका असून पुन्हा एकदा हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. 3 फेब्रुवारीनंतर हवापालट होईल. फेब्रुवारी महिन्यात पहाटे गार वारे तर दिवसा अति प्रचंड उकाडा राहण्याची शक्यता आहे.
शेजारील राज्यांतील गारपिटीचा इशारा
महाराष्ट्राला लागून असलेल्या पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात १ आणि २ फेब्रुवारीला विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये पावसाचे ढग दाटले असल्याने उत्तर महाराष्ट्राच्या नंदुरबार, धुळे सीमावर्ती भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र, काही ठिकाणी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धुक्याचं संकट आणि वाहतूक
उत्तरेकडे पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे धुक्याचे प्रमाण कमी झाले असले, तरी ३ फेब्रुवारीनंतर पुन्हा एकदा दाट धुक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाणाऱ्या रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होऊ शकतो.




