
अनधिकृत बांधकामावर राजापूर नगरपालिकेचा हातोडा
शिवाजी पथवरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने पाडले.
राजापूर : गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा जोरदार चर्चेत असताना मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पालिका प्रशासन अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये शहरातील शिवाजी पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने आज सकाळी थेट काढून टाकण्याची धडक कारवाई करण्यात आली. शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधातील ही धडक कारवाई भविष्यामध्ये अधिक आक्रमकपणे राबविण्यात येणार असल्याचा इशाराही या कारवाईच्या माध्यमातून नगर पालिकेने दिला आहे.
शहरातील शिवाजी पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामाच्या विरोधातील या कारवाईच्यावेळी मुख्याधिकारी अभिजीत कुंभार, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र जाधव यांच्यासह पालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी फौज घटनास्थळी उपस्थित होती.
शहरातील बाजारपेठेसह अन्य भागातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात पालिकेने कारवाई करावी अशी सातत्याने नागरिकांकडून मागणी केली जात होती. मात्र, अनधिकृत बांधकामांच्या विरोधात फारशा कारवाई होत नव्हत्या. अशातच पालिकेने आता अनधिकृत बांधकामांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये शिवाजी पथ रस्त्यावरील अनधिकृत बांधकामावर पालिकेने आज धडक कारवाई केली. त्यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत बांधकाम पालिकेने काढून टाकले. या कारवाईद्वारे वर्षानुवर्षे शहरामध्ये अनधिकृत बांधकामे उभी ठेवणार्यांना एकप्रकारे धडक कारवाईचा इशारा पालिकेने दिला आहे.




