
15 ऑगस्टला देशातील पहिली बुलेट ट्रेन धावणार, रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचं काम देखील झालं आहे. तसेच या प्रकल्पाचं काम दिवस-रात्र सुरु आहे.अतिशय कमी वेळात जास्त अंतर कापणारी ही देशातील पहिली जलद रेल्वे गाडी असणार आहे. त्यामुळे या ट्रेनकडे भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अहमदाबाद-मुंबई हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. या प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रवाशांची प्रतिक्षा सुरु आहे. पण आता प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण अहमदाबाद-मुंबई हा पहिला बुलेट ट्रेन मार्ग आता लवकरच सुरु होणार आहे.
भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार? याबाबत आता अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. देशाची पहिली बुलेट ट्रेनची सर्व्हिस 15 ऑगस्ट 2027 पासून सुरु होईल, अशी घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा हा पहिला टप्पा असेल. या पहिल्या टप्प्यात गुजरातच्या सुरत ते बिलिमोरा अशी बुलेट ट्रेन सर्व्हिस सुरु होईल. या पहिल्या टप्प्यानंतर सुरत ते वापी असा दुसरा टप्पा राहील, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.
अहमादाबाद-मुंबई बुलेट ट्रेनच्या तिसऱ्या टप्प्यात सुरत ते अहमदाबाद अशी बुलेट ट्रेन सर्व्हिस सुरु होईल. तर चौथ्या टप्प्यात महाराष्ट्राच्या ठाण्यापर्यंत बुलेट ट्रेनची सर्व्हिस सुरु होईल. त्यानंतर शेवटच्या सहाव्या टप्प्यात अहमदाबाद ते मुंबई अशी पूर्ण सेवा सुरु होईल. देशातील ही पहिली बुलेट ट्रेन सर्व्हिस असणार आहे. तसेच या पहिल्या बुलेट ट्रेन सर्व्हिसला पूर्णपणे सुरु व्हायला अनेक वर्ष लागतील यात शंका नाही.




