
‘झाले गेले गंगेला मिळाले, आता एकोप्याने काम करायचे’; अजितदादांचे शरद पवारांबरोबर जुळवून घेण्याचे संकेत!
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत आम्ही तुतारीला बरोबर घेतले आहे. घड्याळ आणि तुतारी एकत्र आले आहेत. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचे झाले गेले गंगेला मिळाले, आता आपण एकोप्याने काम करायचे आहे. शरद पवार यांचे नेतृत्व दुरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याची स्तुती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. अजितदादांनी स्तुती करत शरद पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शहरात मंगळवारी तीन जाहीर सभा झाल्या. या तिन्ही जाहीर सभांमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली. तसेच महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे सांगत अजित पवार म्हणाले, महापालिका निवडणुकीसाठी आम्ही तुतारीला बरोबर घेतले आहे. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचे झाले गेले गंगेला मिळाले, आता आपण एकोप्याने काम करायचे आहे. शरद पवार साहेबांचे नेतृत्व म्हणजे दुरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांच्या आशीर्वादाने माझे बरे चालले आहे.
महापालिकेतील सत्ता २५ वर्षे आमच्याकडे होती तरी आम्ही सत्तेचा माज, मस्ती कधी येऊ आम्ही दिली नाही. ही मस्ती उतरविण्यासाठी नागरिकांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहनही पवार यांनी केले.
भ्रष्टाचाराचा ‘आका’ संपवणार
‘महापालिकेतील भ्रष्टाचाराचा ‘आका’ संपवणार आहे. मी कोणाच्या नादी लागणार नाही. विनाकारण माझ्या नादाला कोणी लागले, तर सोडणार नाही. ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी असतात. त्यामुळे कोणाला घाबरायचे नाही,’ असेही अजित पवार म्हणाले.
स्थायी समितीत काय करायचे ते केले आणि आमदार झाला’
भाजपने महापालिका कर्जबाजारी केली. ठेवी मोडल्या आहेत. ४० हजार कोटी रुपयांची कामे कुठे झाली आहेत, याची उत्तरे द्यावीत. त्याला (महेश लांडगे) नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष केले. स्थायी समितीत काय करायचे ते केले आणि आमदार झाला. आता संपत्ती कशी वाढली. दादागिरी किती वाढली आहे, अशी टीका नाव न घेता आमदार लांडगे यांच्यावर केली.
‘आरेला कारे करणार’
गतवेळी महापालिकेत दाखल झालेली भ्रष्ट सत्ता उधळून टाका, असे आवाहन करत त्यांनी, कोणी दहशत, दादागिरी करत असेल, तर मी पण आरेला कारे करणारा आहे, हे लक्षात ठेवा. मी कोणाच्या नादी लागत नाही पण माझ्या नादी कोणी लागलं तर सोडत नाही, या शब्दांत अजित पवार यांनी ठणकावले.
‘मी निवडणुकीपुरता येणारा नाही’
पिंपरी-चिंचवड शहर हे माझे शहर आहे. ही माझी कर्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र घेवून हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या शहराचा कारभार आमच्या हाती असताना आम्ही तोच आदर्श समोर ठेवला. हे शहर मिनी भारत आहे. इथे जातीय सलोखा, सार्वजनिक शांतता आणि सामाजिक सुरक्षा असलीच पाहिजे. त्याला तडे देण्याचे काम इथे कोणी केले? पवना नदीची बिकट अवस्था कोणी केली? आळंदीसारख्या तिर्थक्षेत्राशेजारी कत्तलखान्याचे नियोजन कोण करत आहे? स्टँडीग कमिटीचा चेअरमन लाच घेताना सापडला, त्यातून शहराची बदनामी कोणी केली? गोरगरीब कष्टकर्यांची घरे, व्यवसाय कोण उध्वस्त करतंय? एकेकाळची श्रीमंत महापालिका कर्जबाजारी कोणी केली? महापालिकेच्या हजारो कोटींच्या ठेवी कोणी मोडून खाल्ल्या? हे असले सगळे धंदे करून वर आणखी चार हजार कोटीचे देणे करुन ठेवले आहे. अरे हे चाललंय तरी काय? असे विविध प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.




