
सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या रत्नागिरी जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्षपदी वर्षाराजे निंबाळकर यांची नियुक्ती
◾रत्नागिरी : सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या रत्नागिरी जिल्हा प्रकोष्ठ समितीच्या जिल्हाध्यक्षपदी वर्षाराजे निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या वर्षाराजे निंबाळकर यांच्या कार्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याने जिल्ह्यातील सामाजिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
◾ही नियुक्ती राज्य अध्यक्षा डॉ. सौ. सुनिता ताई मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राज्य अध्यक्षा डॉ. सुनिता ताई मोडक या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या असून, सामाजिक कार्यात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. यावेळी राज्य सहसचिव प्रताप पवार, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सौ. संजना मोहिते, सामाजिक कार्यकर्ते राजूजी भाटलेकर यांचेही विशेष सहकार्य लाभले.
◾नियुक्तीनंतर बोलताना वर्षाराजे निंबाळकर यांनी सांगितले की, “माझ्यावर दाखविण्यात आलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी माझे शंभर टक्के योगदान देईन. हे पद केवळ सन्मानाचे नसून मोठी जबाबदारी आहे. सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या ध्येय-धोरणांनुसार समाजातील दुर्लक्षित, वंचित, निराधार व पीडित घटकांसाठी निष्ठेने काम करेन.” या संधीबद्दल त्यांनी राज्य अध्यक्षा डॉ. सुनिता ताई मोडक, राज्य सहसचिव प्रताप पवार, जिल्हाध्यक्ष सौ. संजना मोहिते तसेच संपूर्ण संस्थेचे मनःपूर्वक आभार मानले.
◾नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, वर्षाराजे निंबाळकर यांनी आजवर सामाजिक क्षेत्रात माणूसपणाच्या मूल्यांशी इमान राखत उल्लेखनीय कार्य केले आहे. स्वतःच्या संसारासोबतच समाजातील दुःखी, उपेक्षित, वंचित व पीडित घटकांच्या जीवनात आशेचा प्रकाश निर्माण करण्याचे दीपस्तंभासारखे कार्य त्यांच्या हातून घडत आहे. त्यांच्या या कार्याचा संस्थेला अभिमान असून, याच कार्याची दखल घेत त्यांची रत्नागिरी जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◾सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बांधव, भगिनी व मातांसाठी अभिमानास्पद असे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. समितीची ध्येय-धोरणे, सामाजिक उपक्रम व कार्यक्रम आपल्या कार्यक्षेत्रात निष्ठेने राबवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील दोन वर्षांच्या कालावधीसाठी असून, त्यांच्या कार्याचा अहवाल पाहून पुढील मुदतवाढीचा निर्णय समिती घेणार आहे.
◼️या नियुक्तीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक कार्याला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




