
सावंतवाडी राजवाडा येथे 7 ते 10 जानेवारीपर्यंत दशावतार महोत्सव
श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी (स्वायत्त) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व लोककला विभाग आयोजित ’लोककला महोत्सव-2026’ च्या अंतर्गत चौथा दशावतार महोत्सव 7 ते 10 जानेवारी या कालावधीमध्ये राजवाडा सावंतवाडी येथे सायं.6.30 ते 10 वा. पर्यंत आयोजित करण्यात आला आहे.दिव्यलोकीचा आभास निर्माण करणारी, इंद्रधनुष्य रंगांची उधळण करणारी रंगभूषा व वेशभूषा, उत्कृष्ट खटकेबाज उत्स्फूर्त संवादाची जोड लाभलेला रांगडा अकृत्रिम अभिनय, पखवाज किंवा तबला, पायपेटी आणि झांजेची लायकारी साथ लाभलेले संगीत या वैशिष्ट्यांसह भाविक लोकरंगभूमीवर अवतीर्ण होणारा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लोककला आविष्कार म्हणजे आपला दशावतार.
जुनी पारंपरिक दशावतार कला जिवंत ठेवण्यासाठी तिथे जतन करण्यासाठी व ती वृद्धिंगत करण्यासाठी तसेच आजचा तरुण वर्ग या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशाने संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सावंतवाडी संस्थांनचे युवराज श्रीमंत लखम सावंत-भोंसले यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने हा पारंपरिक दशावतार मंडळांचा दशावतार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.




